क्रांतिकारी आंदोलनांचा शेवट अनेकदा त्यांच्याच अंतर्गत विरोधाभासात होतो. माओवादी चळवळीत सशस्त्र संघर्ष सुरू ठेवायचा की मुख्य प्रवाहात यायचे, यावरून उघड झालेला मतभेद हे त्याचेच लक्षण आहे
क्रांतिकारी आंदोलनांचा इतिहास पाहिला, तर त्यांचा शेवट अनेकदा दोन टोकांवर जाऊन ठेपतो. एक तर ते सत्तेवर येतात, किंवा स्वतःच्या अंतर्गत विरोधाभासांच्या ओझ्याखाली कोसळतात. भारतातील माओवादी चळवळ आज अशाच एका वळणावर उभी असल्याचे दिसते. पक्षाचे माजी केंद्रीय समिती सचिव तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी यांनी दिलेली एक मुलाखत आणि दुसऱ्या बाजूला मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनूदादा यांचे नेतृत्व यामुळे या चळवळीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र हा संघर्ष केवळ दोन व्यक्तींमधील मतभेद म्हणून पाहणे ही मोठी चूक ठरेल. तो या चळवळीच्या भविष्याचा निर्णायक प्रश्न आहे.
दीर्घकालीन संघर्षाचा हिशेब
सुमारे तीन दशकांपासून भारतातील काही दुर्गम आदिवासी भागांत माओवादी चळवळ राज्यव्यवस्थेला आव्हान देणारी एक सशस्त्र शक्ती म्हणून उभी राहिली. सामाजिक विषमता, आदिवासींचे हक्क आणि जमीन व संसाधनांवरील नियंत्रण या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत या चळवळीने अनेक तरुणांना आकर्षित केले. सुरुवातीला काही प्रमाणात समर्थनही मिळाले, कारण या चळवळीने समाजातील काही गंभीर प्रश्नांवर प्रकाश टाकला होता. पण कालांतराने ती मूळ उद्दिष्टांपासून दूर जाऊ लागली. हिंसाचार, खंडणी, पोलिसांवर आणि सामान्य नागरिकांवरील हल्ले यामुळे तिच्या वैचारिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.
आज ही चळवळ केवळ सुरक्षा दलांच्या दबावामुळे नव्हे, तर स्वतःच्या अंतर्गत वैचारिक मतभेदांमुळेही कमजोर होत आहे. एका बाजूला सशस्त्र संघर्ष चालू ठेवण्याची भूमिका आहे, तर दुसऱ्या बाजूला मुख्य प्रवाहात येऊन वैधानिक राजकीय मार्ग स्वीकारण्याचा विचार पुढे येत आहे.
देवजी आणि सोनू यांच्यातील मतभेद
देवजी यांनी दिलेल्या मुलाखतीत स्वतःला ‘आत्मसमर्पित नव्हे’, तर ‘अंडरग्राउंडमधून ओव्हरग्राउंड’ झालेला नेता असे संबोधले. या शब्दप्रयोगामागे वेगळी राजकीय भूमिका दडली आहे. माओवादी विचारसरणीनुसार सशस्त्र संघर्ष हा त्यांच्या कार्याचा कणा आहे आणि ‘पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’ हा त्याचा प्रमुख आधार आहे. अशा परिस्थितीत एखादा नेता मुख्य प्रवाहात येण्याची भाषा करतो, तेव्हा तो केवळ वैयक्तिक निर्णय नसतो, तर संपूर्ण विचारसरणीच्या पुनर्विचाराचा संकेत असतो.
या मुद्द्यावर सोनू आणि देवजी यांच्यातील मतभेद तीव्र झाले. देवजींच्या मते, सोनू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षातील लोकशाही प्रक्रिया बाजूला सारून शत्रूशी तडजोड केली. त्यांनी सोनूंना ‘गद्दार’ असेही संबोधले. पण या आरोपांच्या पलीकडे जाऊन वस्तुस्थिती पाहिली, तर एक वेगळे चित्र समोर येते. असे सांगितले जाते की सोनूदादा यांच्या आवाहनावर हजारो कॅडर मुख्य प्रवाहात येण्यास तयार झाले. ही केवळ एका नेत्याची वैयक्तिक लोकप्रियता नसून, चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेल्या बदलत्या वास्तवाचे प्रतिबिंब असू शकते.
मूळ प्रश्न : या संघर्षातून काय साध्य झाले?
दीर्घकाळ चाललेल्या सशस्त्र संघर्षामुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. जंगलात बंदूक हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणांना शिक्षण, रोजगार आणि सामान्य आयुष्य यापासून दूर राहावे लागले. त्यांच्या कुटुंबांना सतत भीतीच्या सावटाखाली जगावे लागले. अनेकांनी प्राण गमावले. सुरक्षादलांचे जवानही या संघर्षात शहीद झाले. या पार्श्वभूमीवर प्रश्न निर्माण होतो की, या संघर्षातून नेमके काय साध्य झाले?
चळवळीने ज्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले, ते प्रश्न निश्चितच गंभीर आहेत. आदिवासी भागातील विकासाचा अभाव, जमीन आणि जंगलावरील अधिकारांचे प्रश्न, स्थानिकांना मिळणारा कमी न्याय, या सर्व समस्या आजही अस्तित्वात आहेत. परंतु त्या प्रश्नांचे उत्तर हिंसाचारात आहे का, हा मूलभूत प्रश्न आहे, कारण गेल्या तीन दशकांत या हिंसक मार्गाने त्या समस्यांचे समाधान झालेले दिसत नाही.
बदलती परिस्थिती आणि लोकशाहीचे मार्ग
आज परिस्थिती बदलत आहे. राज्याच्या विकास योजनांचा विस्तार, रस्ते, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी यामुळे दुर्गम भागातही बदल दिसू लागले आहेत. अर्थातच हे बदल पुरेसे नाहीत, पण संवाद आणि लोकशाही प्रक्रियेद्वारे त्यांना अधिक बळ देता येऊ शकते. अशा वेळी बंदुकीचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येणे, हा पर्याय अनेक कार्यकर्त्यांना अधिक व्यवहार्य वाटू लागला आहे. या दृष्टिकोनातून सोनू यांची भूमिका केवळ ‘तडजोड’ नसून, वास्तवाची जाणीव म्हणूनही समजता येते. संघर्षाच्या दीर्घ काळानंतर कोणत्याही आंदोलनाला स्वतःचा पुनर्विचार करावा लागतो. जगाच्या इतिहासात अशा उदाहरणांचा उल्लेख करता येईल. अनेक क्रांतिकारी चळवळी शेवटी राजकीय प्रक्रियेत सामील झाल्या आणि हिंसक मार्ग सोडून लोकशाहीचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे परिवर्तन अधिक स्थिर आणि व्यापक स्वरूपात घडू शकले.
याचा अर्थ असा नाही की देवजी किंवा इतर कट्टर नेत्यांच्या भावना पूर्णपणे चुकीच्या आहेत. त्यांच्या दृष्टीने ही चळवळ केवळ राजकीय संघर्ष नाही, तर त्यांच्या आयुष्याचा आणि विश्वासाचा भाग आहे. त्यांनी दशकानुदशके जंगलात राहून या विचारासाठी लढा दिला आहे. त्यामुळे अचानक मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय त्यांना विश्वासघातासारखा वाटू शकतो. पण काळ बदलत असतो आणि त्यानुसार संघर्षाचे मार्गही बदलावे लागतात.
संवादाची दारे
आज गरज आहे ती या अंतर्गत संघर्षाला एका सकारात्मक शेवटाकडे नेण्याची. बदलत्या परिस्थितीत चळवळीच्या कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था दूर करणे, त्यांना वास्तवाचे भान करून देणे, तसेच संवाद, समावेश आणि पुनर्वसन यावर भर देणे आवश्यक आहे. भारतीय संविधान आणि लोकशाही व्यवस्था त्रुटींपासून मुक्त नसल्या, तरी त्या बदल घडवून आणण्याचे अनेक वैधानिक मार्ग उपलब्ध करून देतात. निवडणुका, सामाजिक आंदोलन, न्यायालयीन प्रक्रिया आणि जनमत या माध्यमांतून समाजात परिवर्तन घडवता येते. बंदुकीच्या आवाजात संवाद हरवतो, तर लोकशाहीच्या मार्गावर संवादाची दारे उघडी राहतात.
माओवादी चळवळीतील अनेक तरुण आज द्विधा मनःस्थितीत आहेत. एकीकडे त्यांनी वर्षानुवर्षे ज्या विचारसरणीसाठी संघर्ष केला, त्यापासून दूर जाण्याची भीती आहे, तर दुसरीकडे सामान्य आयुष्य जगण्याची इच्छा आहे. या दोन्ही भावना समजून घेणे आवश्यक आहे. राज्यानेही पुनर्वसनाच्या योजना प्रभावीपणे राबवून या तरुणांना नवे आयुष्य देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक बंदुकीमागे एक माणूस आहे, त्याची स्वप्ने, त्याचे कुटुंब, त्याच्या आशा. हिंसक संघर्ष चालू राहिला, तर या सर्वांचे भविष्य अंधारातच राहील. पण जर संवाद आणि शांततेचा मार्ग स्वीकारला, तर त्या स्वप्नांना नवे आयुष्य मिळू शकते.
सोनू असो किंवा देवजी, दोघांनीही या टप्प्यावर व्यक्तिगत वादात न पडता, त्यापलीकडे जाऊन व्यापक हिताचा विचार करणे गरजेचे आहे. जर या अंतर्गत संघर्षाला सकारात्मक शेवट मिळाला, तर तो केवळ माओवादी चळवळीचा पराभव ठरणार नाही; उलट तो हिंसेच्या मार्गावरून लोकशाहीच्या मार्गाकडे झालेला एक ऐतिहासिक प्रवास ठरेल. हजारो लोकांचे आयुष्य, आदिवासी भागांचा विकास आणि देशातील अंतर्गत शांतता यासाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरेल. काही निर्णय आंदोलनाला विखुरून टाकतात, तर काही त्यांना नवी दिशा देतात. आज माओवादी चळवळ अशाच एका निर्णायक वळणावर उभी आहे. या वळणावरून पुढे जाण्याचा मार्ग बंदुकीच्या धुरातून नव्हे, तर संवादाच्या प्रकाशातूनच निघतो. जर या संघर्षाला विराम देऊन शांततेचा मार्ग स्वीकारला गेला, तर तो केवळ एका चळवळीचा नव्हे, तर संपूर्ण समाजाचा विजय ठरेल.
संजयसिंह ठाकूर, नक्षल विषयक अभ्यासक (‘प्रासंगिक’, लोकशाही वार्ता, १६ मार्च २०२६)
Comments (0)
No comments yet.